डिजिटल 7/12 ला कायदेशीर मान्यता : बावनकुळे यांची माहिती

    10-Dec-2025
Total Views |
 
 

fff 
महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पाेर्टलवरून आता अवघ्या पंधरा रुपयांत सातबारा उतारा मिळू शकेल.डिजिटल स्वाक्षरीने (क्यूआर काेड व 16 अंकी पडताळणी क्रमांकासह) मिळणारे गाव नमुना 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे सर्व शासकीय, निमशासकीय, तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर व वैध असतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.शेतकरी आणि नागरिकांना घरबसल्या पारदर्शक, जलद आणि कायदेशीर सेवा मिळावी हाच या निर्णयामागचा उद्देश असून, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.ग्रामीण भागात सातबारा. 8 अ आणि फेरफार उताऱ्यांसाठी नागरिकांची अनावश्यक अडवणूक हाेत असल्याच्या तक्रारी हाेत्या. त्यासाठी हे सर्व दस्तावेज ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता.
 
मात्र, सातबारा किंवा 8 अ यासारखे उतारे ऑनलाईन माध्यमातून मिळवल्यानंतरही त्यावर तलाठ्याचा शिक्का स्वाक्षरी घ्यावी लागत असे.त्यामुळे हाेणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसावा यासाठी डिजिटल साताबाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली असून, त्याबाबतचा निर्णयही निर्गमित करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 5 नुसार हे संगणकीकृत अभिलेख मूळ दस्तावेजाची सत्यप्रत मानले जातील, त्यामुळे तलाठी किंवा अन्य काेणत्याही अधिकाऱ्याच्या हस्ताक्षराची गरज संपुष्टात आली आहे. नागरिकांना https://bhulekh.mahabhumi. gov.in/या संकेतस्थळावर 7/12 उतारा माेफत पाहता येईल. परंतु, ताे केवळ माहितीपुरताच वापरता येईल.अधिकृत कामासाठी डिजिटल स्वाक्षरीत उतारा पाहिजे असल्यास फक्त 15 रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.