ढाेल-ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघाेष, तुताऱ्यांचा निनाद, झांजांचा आवाज अन् हेलिकाॅप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके. अशा अलाेट उत्साहात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी संताेष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पाेलीस अधीक्षक तुषार दाेशी, उपवनसंरक्षक अमाेल सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात भवानी मातेची महापूजा करण्यात आली. तसेच, भवानी मातेच्या मंदिरासमाेर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून भगव्या ध्वजाचे राेहण करण्यात आले. यावेळी ढाेल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालख्यांची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची वाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाेलीस अधीक्षकांसह सर्व मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. सातारा पाेलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.