मृताचा ‘आत्मा’ घेऊन जाण्यासाठी...

    01-Dec-2025
Total Views |
 

death 
 
मध्य प्रदेशातील रतलाम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात 21 नाेव्हेंबर दरम्यान एक विचित्र घटना घडली. काही लाेक ढाेल वाजवून नाचत आणि गाणी म्हणत येथे पाेहाेचले. त्यांना पाहून असे वाटते की हे नृत्य बाळाच्या जन्माच्या आनंदासाठी किंवा खूप आजारी रुग्णाच्या बरे हाेण्यामुळे असू शकते, परंतु तसे अजिबात नव्हते. प्रत्यक्षात, रतलाम वैद्यकीय महाविद्यालयात एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हाेता आणि त्याचे कुटुंबीय त्याचा ‘आत्मा’ घेण्यासाठी येथे आले हाेते. ही गाेष्ट ऐकायला विचित्र वाटत असली तरी तेथील आदिवासी समुदायाची ही परंपरा आहे.स्थानिक आदिवासी समुदायाच्या श्रद्धेनुसार, एखाद्या व्यक्तीचा आत्मा ताे जिथे मरताे तिथेच राहताे. मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्य ताे आत्मा घेण्यासाठी येतात.
 
नंतर या आत्म्याला शेतात किंवा गावाबाहेर पुतळा बनवून पुरले जाते. या प्रकरणात, काही दिवसांपूर्वी जवळच्या गावात राहणाऱ्या शांतीलाल झाेरिया (वय 35) नावाच्या एका व्यक्तीने कीटकनाशक प्राशन केले हाेते. त्यानंतर त्याला उपचारासाठी रतलाम वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले; परंतु येथेच उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर, आदिवासी समुदायाच्या श्रद्धेनुसार, कुटुंबातील सदस्य शांतीलालचा ‘आत्मा’ घेण्यासाठी ढाेल वाजवत मेडिकल काॅलेजमध्ये पाेहाेचले आणि एका प्रतिकात्मक पात्रात शांतीलालचा आत्मा घेऊन निघून गेले.येथील लाेक या आदिवासी परंपरेशी परिचित असल्याने त्यांना मेडिकल काॅलेजमध्ये काेणीही राेखले नाही.