बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सरकार मदत देणार

    30-Nov-2025
Total Views |
 


cc 
 
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुरात राज्यातील सुमारे 12373 विहिरींचे नुकसान झाले हाेते. नुकसानग्रस्त विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 15 हजार प्रमाणे 18 काेटी 56 लाखांचा निधी अग्रीम स्वरुपात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.अतिवृष्टी आणि महापुरात अनेक विहिरी खचल्या आहेत. काही विहिरी पूर्णपणे बुजल्या आहेत, कठडे ढासळले आहेत. त्यामुळे रब्बीतील सिंचनास अडथळे येत आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे विहीर दुरुस्तीच्या कामासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के आणि 15 हजार रुपये कमाल मर्यादेत आगाऊ रक्कम (अग्रीम) देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार 18 काेटी 56 लाख रुपये वितरित करण्याचे आदेश राेजगार हमी विभागाने दिले आहेत.
 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 5330 शेतकऱ्यांना 8 काेटी रुपये वितरित केले जाणार आहेत.नाशिकमध्ये 4 काेटी 53 लाख, पुण्यात 2 काेटी 50 लाख व अमरावतीत 2 काेटी 90 लाखांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. नागपुरात 50 लाख आणि काेकण विभागात 13 लाखांचा निधीवितरित केला जाणार आहे.राज्यात सुमारे बारा हजारांहून जास्त विहिरी बुजून गेल्या आहेत. या विहिरींची दुरुस्ती न केल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामात सिंचनाचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदपाटील यांनी बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली हाेती.राज्य सरकारने मदत पॅकेजची घाेषणा करताना प्रत्येक विहिरीसाठी 30 हजारांची तरतूद केली आहे. त्यापैकी निम्मा निधी अग्रीम स्वरूपात राेजगार हमी विभागाकडून देण्यात येणार आहे.