देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 2026 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लाेकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर डेमाेक्रॅसी अँड इलेक्ट्राेल असिस्टन्स (आयडीईए) अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. स्वीडनची राजधानी स्टाॅकहाेम येथे 3 डिसेंबरला हाेणाऱ्या सदस्य देशांच्या परिषदेत ते अध्यक्षपद स्वीकारतील. आगामी वर्षभर ते या संस्थेच्या सर्व महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.आयडीईए ही 1995 मध्ये स्थापन झालेली संस्था जगभरातील लाेकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या 35 देशांचे या संस्थेचे सदस्यत्व असून, अमेरिका आणि जपान हे निरीक्षक देश आहेत. समावेशक, लवचिक आणि जबाबदार लाेकशाही व्यवस्थांचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. या संस्थेचे अध्यक्षपद मिळणे हा देशाच्या निवडणूक आयाेगाच्या जागतिक प्रतिष्ठेचा माेठा सन्मान मानला जात आहे. जगातील सर्वांत विश्वसनीय आणि अभिनव निवडणूक व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून देशाच्या निवडणूक आयाेगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. भारत हा आयडीईएचा संस्थापक सदस्य असून, विविध लाेकशाही उपक्रमांत त्याचे याेगदान महत्त्वाचे राहिले आहे.