फायर ब्रिगेडसाठी 104 मीटर हायड्राॅलिक प्लॅटफाॅर्म खरेदी करणार

    28-Nov-2025
Total Views |
 

fire 
 
मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल आता 104 मीटर किंवा त्याहून अधिक उंची गाठू शकणाऱ्या दाेन नवीन हायड्राॅलिक प्लॅटफाॅर्मची खरेदी करणार आहे.सध्या अग्निशमन दलाकडे 90 मीटर उंचीपर्यंत पाेहाेचू शकणारे हायड्राॅलिक प्लॅटफाॅर्म असून, ते इमारतीच्या तिसाव्या मजल्यापर्यंत पाेहाेचू शकतात. यात टर्न टेबल लॅडर व उच्च क्षमतेचे वाॅटर पंप असणार असून, ते इमारतीच्या 34 व्या मजल्यापर्यंत पाेहाेचू शकणार आहेत.पालिकेच्या नियमानुसार, 30 मीटरपेक्षा (सुमारे नऊ मजले) अधिक उंचीची इमारत ‘हाय-राइज’ मानली जाते.अग्निशमन दलाच्या ताफ्यात 90मीटर उंचीचे हायड्राॅलिक प्लॅटफाॅर्म 2015 पासून कार्यरत आहेत.आता 104 मीटर हायड्राॅलिक प्लॅटफाॅर्म खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यास दाेन वर्षांची हमी आणि पाच वर्षांची सर्वसमावेशक देखभाल आणि सेवा करार बंधनकारक असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. या करारांतर्गत उपकरणाची संपूर्ण सेवा, दुरुस्ती आणि तांत्रिक देखभाल केली जाईल.