पैं भक्ति एकी मी जाणें। तेथ सानें थाेर न म्हणे। आम्ही भावाचे पाहुणे। भलतेया ।। 9.395

    23-Nov-2025
Total Views |
 

saint 
 
लहान थाेरपणाचा विचार न करता केवळ भाव ठेवून परमेश्वराची भक्ती करणारे त्याला किती प्रिय असतात हे या ओवीत सांगितले आहे.ईश्वराच्या प्राप्तीसाठी माेठेपणाची जरूरी नाही. सूर्याच्या प्रकाशापुढे चंद्राचे तेज लाेप पावते. काजव्याच्या प्रकाशाची सूर्यापुढे काय किंमत आहे? माझ्या प्राप्तीसाठी शंकराचे तपही कमी पडले, तेथे सामान्य मनुष्य अभिमानाने मला कसे जाणणार? म्हणून शरीराची ममता साेडावी, सर्व गुणांचे लिंबलाेण करावे, संपत्ती त्याच्यावरून ओवाळून टाकावी, म्हणजे माझी प्राप्ती हाेईल. केवळ भाव असला म्हणजे किती थाेडक्यात आपण संतुष्ट हाेताे हे सांगताना भगवंत म्हणतात, अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने जे काही मला देशील ते मला आवडेल. कशाचेही फळ असले तरी चालेल. भक्ताने ते मला नुसते दाखविले तरी ते घेण्यासाठी मी माझे दाेन्ही हात पुढे करताे. आणि देठ न काढताही मी ते भक्षण करताे.
 
भक्ताने ूल जरी अर्पण केले तरी त्याचा वास घेण्याऐवजी मी प्रेमास भुलून ते मुखातच घालताे. मला केवळ सुकलेले पान जरी दिले तरी अत्यंत सुख वाटते.पाण्याचा थेंबही मला प्रेमाने अर्पण केला की मी संतुष्ट हाेताे. प्रेमाने एवढे अर्पण केले की वैकुंठाहून माेठे मंदिर मला प्राप्त हाेते.काैस्तुभ मण्याहून तेजस्वी असे रत्न मिळते.क्षीरसागराहून माेठा सागर प्राप्त हाेताे. कापूर, चंदन, अगरू अशी सुगंधी द्रव्ये मिळतात.गरुडासारखी वाहने मिळतात.कामधेनूचे कळप प्राप्त हाेतात आणि अर्जुना, सुदाम्याने आणलेली पाेह्याची पुरचुंडी मी किती आवडीने साेडली हे तुला माहीत आहे. यावरून आम्ही भावाचे पाहुणे आहाेत हे तुझ्या लक्षात येईल.