पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहा : डॉ. बाबा आढाव

    06-Oct-2025
Total Views |
 
 pur
पुणे, 4 ऑक्टोबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
राज्यात पावसामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो शेतकऱ्यांची उभी पिकेच नव्हे, तर संसारही वाहून गेले आहेत. अशावेळी शासनाने ओला व कोरडा दुष्काळ यामध्ये न पडता संकटग्रस्तांसोबत उभ राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी जयंती दिवशी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी देणगी स्वीकारण्यासाठी म. गांधी पुतळा येथे डॉ. आढाव व पुरोगामी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यांची बैठक आयोजित केली होती.
 
त्यावेळी ते बोलत होते. डॉ. आढाव म्हणाले, न भूतो अशा प्रकारचे हे ओल्या दुष्काळाचे संकट सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. पावसाने सगळं वाहून गेलेल्या राज्यात दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे, असे शब्दांचे खेळ न करता संकटग्रस्तांबरोबर उभे राहिल पाहिजे. तशी मानसिकता ठेवली पाहिजे. सरकारलासुद्धा अंतकरण असते. ते असेल तर दुष्काळ ओला की कोरडा, हा प्रश्न पडत नाही, या शब्दात समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी राज्य व केंद्र सरकारचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, संकट केवळ अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाचे नाही, तर राज्यकर्त्यांच्या मानसिकतेच जास्त आहे.
 
आधी विरोधी पक्षात असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे सत्तेत आल्यावर नियमांमध्ये अशाप्रकारची तरतूद नाही, असं बोलायला लागल्यावर भरवसा कुणावर ठेवायचा हा प्रश्न पडतो. सरकार पाडण्यासाठी पैशांचा पाऊस पाडणारे खऱ्या पावसाने थैमान घातल्यानंतर हात वर करत असतील, तर ते अतिशय गंभीर आहे. ओल्या दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी सरकारने बहाणे करू नयेत तसेच कुठलाही मुद्दा प्रतिष्ठेचा न करता सर्वांचे सहकार्य घ्यावे. सुरुवातीलाच डॉ. आढाव यांच्या हाकेला नेहमी पहिला प्रतिसाद देणाऱ्या हमाल पंचायतीच्या विविध संस्थांच्या वतीने मदतीचे धनादेश डॉ. आढाव यांच्या सुपूर्द करण्यात आले.
 
हमाल पंचायतीच्या मजूर संस्था, पतसंस्था, हमाल व्यापारी ट्रान्सपोर्ट तरुण मंडळ, पथारी व्यावसायिक पंचायत, मोलेदिना हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी पथारी पंचायत, रिक्षा पंचायत संघटना व रिक्षा पंचायत नागरी सहकारी पतसंस्था, अंगणवाडी कर्मचारी सभा, अंगणवाडी कर्मचारी नागरी सहकारी पतसंस्था, हमाल पंचायत लोणावळा, भुसार विभागातील तोलणार, हमाल पंचायत रेल्वे मालधक्का पार्सल विभाग, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, संविधान जागर अभियान, पवन पायगुडे यांची स्वान इंडस्ट्री या संस्थांबरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांपासून ते कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीमध्ये काम करणारे, हमाल पंचायतीत काम करणारे कर्मचारी, अंगणवाडी ताई, घरकामगार महिला यांनीही वैयक्तिक पातळीवर मदत निधीमध्ये आपला सहभाग दिला. ज्ञानेेशरी पवार या चिमुकलीने आपल्या खाऊच्या पैशातून मदत दिली. एकूण दीड लाख रुपये धनादेशाद्वारे, तर पन्नास हजार रुपये रोख अशी दोन लाख रुपयांची मदत गोळा झाली.