काेल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्यास 191 वर्षे पूर्ण

    05-Oct-2025
Total Views |
 

Kolhapur 
 
काेल्हापूरच्या शाही दसरा महाेत्सवांतर्गत ऐतिहासिक नगारखान्यास 191 वर्षे पूर्ण झाल्याचा आणि 2 ऑक्टाेबर 1834 राेजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचा साेहळा ‘काेल्हापूरची शाैर्यगाथा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा झाला. विशेष म्हणजे यंदा 2 ऑक्टाेबर हा विजयादशमीचा सण हाेता. भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलताेरण शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांच्या हस्ते बांधण्यात आले.हीलरायडर्स अँडव्हेंचर फाउंडेशनतर्फे गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.हा उपक्रम काेल्हापूरचा अभिमान आहे, असे शाहू महाराज छत्रपती यांनी नमूद केले.काेल्हापूरची शाैर्यगाथा या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा गाैरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी गीते, नृत्ये आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
 
यावेळी नगारखाना इमारतीच्या समृद्धइतिहासाची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. काेल्हापुरातील युवा सॅक्साेफाेन वादक अरहान मिठारी याने आम्ही आंबेचे गाेंधळी, लल्लाटी भंडार आणि आईचा गाेंधळ या गीतांना सॅक्साेफाेनच्या मधुर स्वरांनी सजवले. त्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.सन 1828 ते 1833 या कालावधीत पाच लाख रुपये खर्चून बांधलेली पाच मजली नगारखाना इमारत काेल्हापूरच्या ऐतिहासिक वारसाची साक्ष आहे. स्थानिक कारागिरांनी बेसाल्ट दगडाचा वापर करून तयार केलेल्या आयने महालातील चकाकणाऱ्या भिंती आणि खांब आजही या इमारतीचे वैशिष्ट्य आहेत. जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक घड्याळ, नगारे वाजवण्याचे ठिकाण, भगवा ध्वज, गॅलरी, पायऱ्या आणि खिडक्या यांसारख्या कलाकृतींची पाहणी केली. या सर्व वैशिष्ट्यांनी नगारखान्याचा ऐतिहासिक वारसा आजही जिवंत असल्याचे दिसून आले.