मलनिस्सारण प्रकल्पांमुळे नदी प्रदूषण कमी होणार : केंद्रीय मंत्री मोहोळ

    03-Oct-2025
Total Views |
 
 ma
पुणे, 1 ऑक्टोबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) ः
 
पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांसाठी केंद्र सरकारने 332 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली असून, त्यामुळे पुणे शहरातील नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पर्वती विधानसभा मतदारसंघात सिंहगड रस्ता परिसरातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कार्यक्रमात मोहोळ बोलत होते.
 
यावेळी नगरविकास राज्यमंत्री आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‌‘अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेअंतर्गत या मलनिस्सारण प्रकल्पाची एकूण किंमत 1,437.94 कोटी रुपये असून, त्यापैकी 533.85 कोटी रुपयांचे काम आधीच मंजूर झाले आहे. त्यात नव्याने 332.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच कामाला गती मिळणार आहे. या आराखड्यांतर्गत जुन्या ड्रेनेज लाइन्स बदलण्यात येणार असून, जवळपास 472 किलोमीटर नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. यासोबतच 8 नवीन मलशुद्धीकरण केंद्रे (एसटीपी) उभारली जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 201 एमएलडी इतकी असेल.
 
खडकवासला, नऱ्हे, जांभुळवाडी, नांदोशी, किरकटवाडी, पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, भिलारवाडी, सुस, म्हाळुंगे, गुजर निंबाळकरवाडी आणि मांगडेवाडी या गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामांची अंमलबजावणी केली जाणार आहे.‌’ पुणेकर नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीतील हा मोठा टप्पा आहे. समाविष्ट गावांमध्ये स्वच्छ व शास्त्रशुद्ध मलनिस्सारण यंत्रणा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.