गुन्हेगारांना संरक्षण, देशाच्या सेवकांना तुरुंग?

    03-Oct-2025
Total Views |
 
g
 
शिवाजीनगर, 1 ऑक्टोबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) ः
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांनी केंद्र व राज्य सरकारवर गंभीर आरोप करत पुण्यात जोरदार आंदोलन केले. पक्षाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री नीलेश घायवळसारख्या खंडणी, दरोडा, अपहरण आणि खून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या गुन्हेगाराला लंडनला पळून जाण्यास संरक्षण देत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकार सोनम वांगचुकसारख्या देशभक्त आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या समाजसेवकाला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) तुरुंगात टाकत आहे.
 
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. लडाखमधील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे सोनम वांगचुक यांना त्यांच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाले आहेत. त्यांनी सैनिकांसाठी अत्याधुनिक तंबू विकसित करून भारतीय सेनेची मदत केली.
 
भाजप सरकारच्या धोरणांवर टीका आणि चीनने लडाखमधील जमीन कब्जा करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांना जोधपूर तुरुंगात टाकण्यात आले, तर दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ खोट्या पत्त्या व पासपोर्टच्या आधारे लंडनला पळाला. हे सरकारी मदतीशिवाय शक्यच नव्हते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.