नवव्या अध्यायाचा प्रारंभ ज्ञानेश्वरांनी काेणास उद्देशून केला आहे हा कधी कधी वादाचा मुद्दा हाेताे.ते श्राेत्यांना उद्देशून म्हणत आहेत की, निवृत्तिनाथांशी बाेलत आहेत, असा संभ्रम पडताे; पण या शंकेत पडण्याचे कारण नाही.या ठिकाणी निवृत्तिनाथ हे स्ूर्तिस्थान असले तरी ते एक श्राेतेच आहेत.तेव्हा या ओव्या निवृत्तिनाथांसह सर्व श्राेत्यांना उद्देशून आहेत असे मानणे उचित हाेईल. मागील ओवीत ज्ञानेश्वर एक प्रतिज्ञा अशी करतात की, श्राेतेहाे, तुम्ही अवधान देऊन माझे निरूपण ऐकले तर तुम्हांला सर्व सुख प्राप्त हाेईल. इतके सांगितल्यावर आपण प्रतिज्ञा घेऊन बाेललाे हे ज्ञानेश्वरांच्या ध्यानात आले.आपण माेठे धैर्य केले, आपल्या हातून थाेडा उद्धटपणा झाला असे त्यांना त्वरित वाटले आणि ते लगेच कळवळून श्राेत्यांना म्हणतात की, महाराज तुम्हां सर्व संतांपुढे मी प्रतिज्ञा घेऊन माेठ्या आढ्यतेने बाेलत आहे असे नाही.
माझे हे बाेल गर्वाचे नसून आपण लक्ष द्यावे.अशी लडिवाळ विनंती आहे. श्राेतेहाे, तुमच्यासारखे प्रेमळ व मनाेरथ पूर्ण करणारे श्राेते मायबाप म्हणून ज्याला लाभले आहेत, ताे मी थाेडा हट्ट करत आहे.हा हट्ट वा माझे मनाेरथ तुम्ही सहज रीतीने पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा माझ्या अंत:करणात प्रसन्नतेचे हिरवेगार मळे पिकविताे.या सावलीत मी संसारतत्प असा जीव माेठ्या आनंदाने लाेळत आहे. प्रभू, तुम्ही संतपुरुष सुखाच्या अमृताचे खाेल डाेह आहात, म्हणून मी त्याच्यात मनसाेक्त स्नान करीत आहे.तुमच्या ठिकाणी ही मी सलगी करण्यास भ्यालाे अथवा संकाेचलाे तर मग माझे चित्त काेठे शांत हाेईल?