माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फाॅर ट्रान्सफाॅर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार (25 ऑक्टाेबर), साेमवार (27) आणि मंगळवारी (28 ऑक्टाेबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन एआयआर या माेबाइल अॅपवर ऐकता येणार आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (28 ऑक्टाेबर) रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही ती उपलब्ध हाेईल.ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुजे यांनी घेतली आहे. राज्याच्या जलद आणि व्यापक विकासासाठी, खासगी क्षेत्र आणि गैरसरकारी संस्थांच्या सहभागाद्वारे प्रभावी धाेरणात्मक आणि तांत्रिक दिशा देण्यासाठी शासनाने ‘मित्रा’ या राज्यस्तरीय थिंक टँकची स्थापना केली आहे.
ही संस्था नीती आयाेगाच्या धर्तीवर राज्यातील सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून, राज्याच्या विकासप्रक्रियेला धाेरणात्मक दिशा प्रदान करते. राज्य शासनाच्या विविध विभागांना उद्दिष्टे साध्य करण्यात सक्षम करण्याबराेबरच या संस्थेचे लक्ष कृषी व संलग्न क्षेत्र, आराेग्य व पाेषण, शिक्षण, काैशल्य विकास व नवाेन्मेष, शहरीकरण व बांधकाम क्षेत्र विकास, वित्त, पर्यटन, क्रीडा, ऊर्जा संक्रमण व हवामान बदल, उद्याेग व लघुउद्याेग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण अशा 10 प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहे.याशिवाय पर्यावरण, वन व वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही विशेष भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने जय महाराष्ट्र आणि दिलखुलास कार्यक्रमात प्रवीण परदेशी यांनी संस्थेचे उपक्रम, सहभाग आणि राज्याच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा करण्यात येणारा अवलंब याविषयी माहिती दिली आहे.