मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशाेभीकरण व विकास प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. या अनुषंगाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महालक्ष्मी मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच, या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.सर्व कामांना गती देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.मुंबईत विविध प्राचीन धार्मिक स्थळे असून, त्यात भुलाभाई देसाई मार्गावरील महालक्ष्मी मंदिराचाप्रामुख्याने समावेश हाेताे.मंदिर आणि परिसराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी अधिक चांगल्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करता याव्यात, यासाठी मंदिर परिसराचे सुशाेभीकरण आणि विकास प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे.
महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकाने/ गाळ्यांची पुनर्रचना करून सुसूत्रीकरण करणे व रस्त्यांची सुधारणा करणे, मार्गावरील भिंतींवर कलात्मक रंगरंगाेटी करणे, पुरातन वारसा (हेरिटेज) शैलीतील विद्युत खांब आणि स्ट्रीट फर्निचर उभारणे, दिशादर्शक फलक स्थापित करणे, मुख्य मार्गावर आकर्षक कमानी उभारणे, गर्दीच्या नियाेजनासाठी आवश्यक उपाययाेजना करणे, परिसरात आकर्षक विद्युत राेषणाई करणे, आवश्यकतेनुसार भित्तीशिल्पे साकारण्यासह अन्य विविध कामे करण्यात येणार आहेत.आयुक्तांनी या संपूर्ण मंदिर परिसरात फिरून पाहणी केली. महालक्ष्मी मंदिर न्यासाकडून प्रस्तावित भक्तनिवास जागेचीही त्यांनी पाहणी केली.