नवव्या अध्यायातील ही पहिलीच ओवी अतिशय महत्त्वाची असून ज्ञानेश्वरीची अनेक वैशिष्ट्ये स्पष्ट करणारी आहे. इतर अध्यायांत ज्ञानेश्वरीची अनेक नमने अर्थगर्भ व रसाळ अशी आहेत; पण या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी सद्गुरुनाथांना, विशेष म्हणजे श्राेत्यांना कळवळून विनंती केली आहे.ते म्हणतात की श्राेते हाे, तुम्ही माझ्या आईप्रमाणे आहात. मला फक्त तुमचे चित्त हवे आहे. तुम्ही चित्त देऊन ऐकले की मला सर्व पावले. अवधान देऊन ऐका, असेही ज्ञानेश्वर या ठिकाणी म्हणत आहेत. आणि हे अवधान कसे तर ऐकलें, म्हणजे फक्त अवधानच द्या, असे त्यांना म्हणावयाचे आहे. अवधान देऊन श्रवण केल्यावर चित्त पेंगणार नाही. ते दुसरीकडे जाणार नाही. अन्य काही ऐकावे असे वाटणार नाही.
आपण काही अपूर्व ऐकत आहाेत अशीच खात्री केवळ प्रेमपूर्वक स्मरण देऊन ऐकल्यावर तुमची हाेईल. माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तुम्हांला सर्वसुखाची प्राप्ती हाेईल असे मी प्रतिज्ञेवर सांगताे. हे सर्वसुख म्हणजे काय? तर परमात्म्याशी एकरूप हाेऊन त्याच्याशी केलेला सुखविलासाचा अनुभव भाेगणे हे हाेय व हा आनंद निर्गुण असाे वा सगुण असाे, अशा परमात्म्याच्या एकरूप अवस्थेत हाेताे. म्हणूनच पुढील काळी तुकारामांनी म्हटले आहे की, ‘सर्वसुखाचें आगर। बाप रखमादेवीवर।’.विटेवर उभा असलेला रखुमाईचा पती, बाप श्रीविठ्ठल हेच सर्वसुखाचे स्थान आहे. ज्ञानेश्वर सद्गुरूंना वा श्राेत्यांना ही विनवणी सलगीने करतात. यावरून ध्यानात येते की, ज्ञानेश्वरी हा सांगितलेला ग्रंथ आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या वाचनापेक्षा श्रवणास महत्त्व आहे.