दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वायत्तता अन् समान हक्क

    23-Oct-2025
Total Views |
 

disable 
दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत, यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना राेजगार मिळावा म्हणून विशेष राेजगार विनिमय केंद्रे तयार करतानाच समावेशक भरती माेहीम आणि उद्याेजकतेसाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दिव्यांग बांधवांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी याेजना तयार करून त्याची अंमलबजावणीही हाेईल. सरकारच्या मंजुरीनंतर सुरू हाेणारे े महाराष्ट्र ‘व्हिजन डाॅक्युमेंट’ उर्वरित राज्यांनाही दिशादर्शक ठरेल.सर्वसमावेशक महाराष्ट्रअंतर्गत सरकारने दिव्यांगांसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, प्रत्येकास प्रतिष्ठा, स्वायत्तता व समान हक्क मिळावेत यासाठी काम केले जाईल.
 
दिव्यांगांना संपूर्ण क्षमतेसह सिद्ध करता यावे यासाठी विभाग काम करेल.शाळा साेडलेली मुले व उशिरा दिव्यांगत्व ओळखल्या गेलेल्या मुलांना आधार मिळावा म्हणून पर्यायी शैक्षणिक प्रणाली व सेतू अभ्यासक्रम राबवला जाईल. मनाेरंजनाच्या कार्यक्रमांसाठी धाेरण तयार केले जाईल, असे दिव्यांग कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. दिव्यांगांच्या हक्कासाठी कार्यरत संस्थांना पाठबळ दिले जाईल.हक्क व सेवांची माहिती देण्यासाठी डिजिटल प्लॅटफाॅर्मचा वापर केला जाईल.दिव्यांग व्यक्तींना राजकीय व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा, सार्वजनिक पदांसाठी उमेदवारी करता यावी म्हणून प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळासाेबत काम करत दिव्यांगांची सामाजिक सुरक्षा बळकट केली जाईल, असे विभागाकडून सांगण्यात आले.