पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे.या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डाॅक्युमेंट’ निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला. या बैठकीत सल्लागार समितीने मान्यता दिली. हा मसुदा मान्यतेसाठी लवकरच मंत्रिमंडळासमाेर ठेवण्यात येणार आहे. काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भाेसले, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह विविध खात्यांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. विकसित महाराष्ट्र 2047 च्या मसुद्यासाठी राज्यात 19 जून ते 28 जुलैपर्यंत सर्व्हे करण्यात आला. यात राज्यभरातून चार लाख नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यात 35 हजार ‘ऑडिओ मेसेज’चा समावेश हाेता. तसेच, विकासाच्या सूचनांचा जास्त अंतर्भाव हाेता. त्याचप्रमाणे विविध विभागांच्या विशिष्ट सर्व्हेमध्ये सात लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी भाग घेतला.