काेणत्याही सिनेसृष्टीत सुपरस्टार बनण्याचे अनेक फायदे असतात, काही ताेटेही असतात.अमिताभ बच्चन, रजनीकांत ही अशी उदाहरणं आहेत, ज्यांची पाॅप्युलर इमेज त्यांच्यातल्या अभिनेत्यापेक्षा माेठी बनून बसली आणि अभिनेता म्हणून त्यांना वेगवेगळ्या भूमिका साकारता आल्या नाहीत फारशा. जेव्हा त्यांनी तसे प्रयत्न केले, तेव्हा ते बाॅक्स ऑफिसवर काेसळले.अर्थात, अमिताभला काहीएका वयानंतर चीनी कम, पिकू, 102 नाॅट आऊट, पिंक आदी सिनेमांमधून वेगवेगळे प्रयाेग करून पाहता आले. पण त्याच्या हार्डकाेअर चाहत्यांच्या पचनी पडणारे हे प्रयाेग नव्हते. त्यांनआवडणारा महानायक अमिताभ या सिनेमांमध्ये त्यांना भेटत नव्हता.
सिंगल स्क्रीन थिएटरच्या प्रेक्षकाला स्टारच्या त्या इमेजमध्ये बांधलेल्या भूमिकाच पाहायला आवडतात.हे ओळखलं दक्षिणेतल्या दिग्दर्शकांनी. त्यांनी अमिताभला संधी मिळेल तेव्हा लार्जर दॅन लाइफ साकारलं आणि गल्लापेटीवर तुफान यश कमावलं. रामगाेपाल वर्माने अमिताभबराेबर सरकार आणि सरकारराज हे सिनेमे केले, त्यात सगळी सुपरस्टारची वैशिष्ट्य हाेती. पुरी जगन्नाथचा बुड्ढा हाेगा तेरा बाप हा सिनेमा तर अमिताभच्या अँग्री यंग मॅनच्या प्रतिमेला दिलेली सिनेमॅटिक सलामच हाेता. कल्की या अलीकडच्या सिनेमात दिग्दर्शक नाग अश्विनने अमिताभला महानायकाच्या भव्य रूपात सादर केलं आणि यश कमावलं. पिटातला पब्लिक सुखावण्यासाठी सुपरस्टार सिनेमात सुपरस्टारसारखेच दिसावे लागतात.