आयपीएस अधिकाऱ्याकडे 5 काेटी राेख व दागिने

    20-Oct-2025
Total Views |
 
 


IPS
 
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली आहे. आयपीएस अधिकारी पंजाबमधील राेपार रेंजमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्त हाेता. अधिकाऱ्याने 8 लाखांची मागणी केल्याने या प्रकरणाचा तपास केला असता त्याच्याकडे घबाड असल्याचं उघड झालं. तपास केला असता त्याच्याकडे 5 काेटी रुपये राेख, आलिशान वाहनं, दागिने आणि महागडी घड्याळं यासह माेठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचं समाेर आलं आहे.2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना कृष्णा नावाच्या एका व्यक्तीसह अटक करण्यात आली आहे, ज्याने कथितपणे त्यांचा मध्यस्थ म्हणून काम केले हाेते.
 
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक व्यावसायिकाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फाैजदारी खटला बंद करण्यासाठी मध्यस्थामार्फत लाच मागताना आणि स्वीकारताना हा अधिकारी पकडला गेला. अधिकारी दर महिन्याला त्याच्याकडे पैशांची मागणी करत हाेता.पंजाबमधील फतेहगड साहिब येथील आकाश बट्टा नावाच्या भंगार विक्रेत्याने पाच दिवसांपूर्वी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर गुरुवारी सीबीआयने गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने आराेप केला आहे की डीआयजी भुल्लर यांनी सुरुवातीला लाच म्हणून 8 लाखांची मागणी केली हाेती. तसंच दर महिन्याला तडजाेड करण्यासाठी पैसे न दिल्यास त्याच्या व्यवसायाशी संबंधित बनावट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत हाेता, असं तक्रारीत सांगण्यात आलं हाेतं.सीबीआयच्या एफआयआरनुसार, भुल्लरने त्यांचा सहकारी कृष्णामार्फत पैसे देण्याची मागणी करत हाेता.
 
कृष्णा पैशांसाठी वारंवार दबाव टाकत हाेता. एका संभाषणात, कृष्णा सांगत आहे की, ऑगस्टचे पेमेंट दिले गेले नाही, सप्टेंबरचे पेमेंट दिले गेले नाही.प्राथमिक पडताळणीनंतर, सीबीआयने चंडीगडच्या सेक्टर 21 मध्ये सापळा रचला. कारवाईदरम्यान, डीआयजीच्या वतीने तक्रारदाराकडून 8 लाख रुपये स्वीकारताना कृष्णा रंगेहाथ पकडला गेला.अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पैसे मिळाल्यानंतर लगेचच, तक्रारदार आणि डीआयजी यांच्यात एक काॅल आयाेजित करण्यात आला हाेता, ज्यामध्ये अधिकाऱ्याने पैसे मिळाल्याची कबुली दिली आणि दाेघांनाही त्यांच्या कार्यालयात जाण्याची सूचना दिली.या पुराव्याच्या आधारे, सीबीआय पथकाने डीआयजी भुल्लर यांना माेहाली येथील त्यांच्या कार्यालयातून कृष्णासह अटक केली.