स्वदेशी ‘तेजस एमके-1 ए’चे शुक्रवारी हाेणार उड्डाण

    15-Oct-2025
Total Views |
 

Tejas 
 
हवाई दलातून निवृत्त हाेणाऱ्या बहुतांश लढाऊ विमानांची जागा स्वदेशी बनावटीच्या हलक्या तेजस विमानांना दिली जाणार आहे. हिंदुस्थान एराेनाॅटिक्स लि.च्या (एचएएल) नाशिक प्रकल्पातील सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या हलक्या ‘तेजस एमके-1 ए’ या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेणार आहे.या निमित्ताने बंगळूरू पाठाेपाठ नाशिक प्रकल्पात तेजसच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ राेवली गेली आहे. हवाई दलात लढाऊ विमानांच्या एकूण 42 तुकड्या मंजूर आहेत.अलीकडेच मिग-21 विमानाच्या दाेन तुकड्या (स्क्वाॅड्रन) निवृत्त झाल्यामुळे दलाची लढाऊ ताकद 29 सक्रिय लढाऊ विमान तुकड्यांवर आली. मंजूर संख्येच्या तुलनेत मागील सहा दशकांतील तुकड्यांची ही सर्वांत कमी संख्या मानली जाते. तेजस एमके-1 एच्या पूर्ततेस फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात हाेणे अपेक्षित हाेते. त्यास विलंब झाल्यामुळे हवाई दल एका वेगळ्या टप्प्यावर आले आहे. मिग-21 नंतर पुढील काळात मिग-29, जॅग्वार आणि मिराज-2000 ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील.
 
या स्थितीत उत्पादनातील कालापव्यय दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करेल, अशी भीती हवाई दलासह तज्ज्ञांनी वर्तवली हाेती.
हवाई दलाने एचएएल-83, तेजस एमके-1 ए विमानांची मागणी नाेंदवली आहे. 47 हजार काेटींचा हा करार आहे. हवाई दलाची निकड आणि काही देशांनी तेजसमध्ये स्वारस्य दाखवल्याने उत्पादनास गती मिळणे अपेक्षित हाेते; परंतु तसे झाले नाही. या विमानात सुमारे 75 ट्नके स्वदेशी सामग्री वापरली जाते.इंजिनासाठी अमेरिकेच्या जीई एराेस्पेसशी करार झाला. तंत्रज्ञान हस्तांतराद्वारे एफ 404 इंजिन स्थानिक पातळीवर तयार केले जाईल. इंजिन पुरवठ्यास काही महिन्यांचा विलंब झाला.जीई कंपनी 2023-24 या वर्षात 16 इंजिन देणार हाेती. मात्र, आवश्यकतेनुसार त्याची पूर्तता न केल्यामुळे एचएएलची काेंडी झाली. याची झळ उत्पादनास बसली. एचएएलने आता तेजस एमके-1 एची पहिली तुकडी पुढील तीन महिन्यांत देण्याची याेजना आखली आहे.