पाणी मनुष्यजातीसाठी मूलभूत गरज आहे. जेवढी महत्त्वपूर्ण स्वच्छ हवा आहे, तेवढेच महत्त्वपूर्ण आहे स्वच्छ, पिण्यालायक असे पाणी. संपूर्ण जगामध्ये मानवी वस्तीच्या प्रमाणात पाण्याचा पर्याप्त स्राेत नसल्याने जलसंग्रह करणे फार महत्त्वाचे आहे. (भाग 1) व्यक्तिगत पातळीवर पूर्वीच्या काळी लाेक मातीच्या भांड्यांत, मग नंतर धातूच्या - जसे की तांब्या - पितळेच्या भांड्यांत आणि मग स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करीत हाेते. परंतु, नंतरहून आधुनिक टेक्नाॅलाॅजीच्या काळात वजनात हलके आणिआर्थिकदृष्ट्या स्वस्त अशा प्लास्टिकचा वापर वाढू लागला.ओपन एक्सेस जर्नल बीएमजे ग्लाेबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, आराेग्य निष्णांतांनी चेतावनी दिली आहे की, बाटलीबंद पाणी मानव आणि पृथ्वीच्या आराेग्यावर जाे माेठा आणि वाढता प्रभाव पाडत आहे, त्याच्या वापरावर तत्काळ पुनर्विचार करण्याची गरज आहे.
कारण हेच आहे की जगभरात प्रत्येक मिनिटाला 10 लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. वाढत्या मागणीमध्ये हा आकडा अद्याप आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, जगभरातील अंदाजे दाेन अब्ज लाेक, ज्यांना पिण्याचे पाणी मर्यादित किंवा बिलकूलच मिळत नाही, हे सर्व लाेक बाटलीबंद पाण्यावर विसंबून आहेत.परंतु, उर्वरित लाेकांसाठी आधुनिक सुविधा आणि मार्केटिंगच्या प्रभावाने, बाटलीबंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा जास्त सुरक्षित आणि बरेचदा आराेग्यप्रद आहे अशी गाेष्ट पसरवली जात आहे.पण, वास्तविकता काय आहे? पर्यावरण विज्ञान आणि टेक्नाॅलाॅजी नावाच्या मॅगेझीनद्वारे प्रकाशित झालेला एका अहवाल, आपल्याला प्लास्टिकविषयी अचंबित करणारी माहिती देताेय.
या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, दरराेज 39000 ते 52000 सूक्ष्म प्लास्टिकचे कण विविध माध्यमांतून आपल्या शरीरात प्रवेश करताहेत. यासाठीचे सर्वांत माेठे माध्यम म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत. श्वास घेताना शरीरात जाणाऱ्या मायक्राे-प्लास्टिकचीही भर घातल्यास त्यांची संख्या 74,000 मायक्राे प्लॅस्टिकच्या जवळपास आहे.मायक्राे प्लॅस्टिक हे पाॅलिमर कण आहेत, जे 0.2 इंच (5मिलिमीटर) पेक्षाही कमी, म्हणजे एका इंचाच्या 1/25,000 चा भाग (1 माइक्राेमीटर) पर्यंतचा हाेऊ शकताे! त्याही पेक्षा लहान काेणतीही वस्तू नॅनाेप्लास्टिक आहे, ज्याला मीटरच्या अब्जावधी भागांमध्ये माेजले जाते.पेन्सिल्वेनियाच्या काही निष्णांतांनी एक संयुक्त अभ्यास हाती घेतला हाेता, ज्यामध्ये नऊ देशांतील 11 वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सद्वारे विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या 93 % नमुन्यांमध्ये सूक्ष्म आणि नॅनाेप्लास्टिकचे अस्तित्व आढळून आले हाेते.
कतारचे काेर्नेल मेडिसिनचे निष्णांत समजावून सांगतात की, प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून हानिकारक रसायने, वेगळी हाेऊन त्यामध्ये असलेल्या पदार्थांमध्ये मिसळण्याचा धाेका खूप जास्त असताे, विशेषतः जर ते पाणी दीर्घकाळ साठवले गेल्यास किंवा सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानाच्या संपर्कात आले तर. अंदाजे 10 % ते 78 % बाटलीबंद पाण्याच्या नमुन्यांमध्ये दूषित घटक असतात, ज्यामध्ये मायक्राेप्लास्टिकचा समावेश असताे. त्यांना अनेकदा हार्माेन (अंत:स्रावी) विघटन करणारे म्हणून वर्गीकृत केले जाते. तुम्ही जर प्लास्टिक उत्पादनांची जाहिरात किंवा त्याच्यावर लावलेले लेबल नीट पहिले असेल तर बहुतेकदा त्याच्यावर ते बीपीए मुक्त असल्याची जाहिरात केलेली असते. काेणत्याही प्लास्टिकचे उत्पादन जर बीपीए मुक्त असेल तर त्या प्लास्टिकला खाद्यपदार्थांसाठी याेग्य समजले जाते.