राज्य सरकारने राज्यातील 34 जिल्ह्यांत विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. तसेच कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापॅकेज जाहीर केले हाेते. त्यानुसार कर्जवसुलीला स्थगितीचा आदेश काढण्यात आला आहे.जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी या सवलतींचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे. गरजेनुसार निधीचा पहिला टप्पा यापूर्वीच देण्यात आला आहे. दुसरा टप्पा तत्काळ देत आहाेत. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न आहे. कदाचित काही मदत त्यानंतरही मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.