नकारात्मक विचारांवर अशी मात करा

    14-Oct-2025
Total Views |
 

thoughts 
 
आपल्या दरराेजच्या कार्यात आम्हाला नकारात्मक विचार उद्भवतात असा अनुभव येताे. त्यांना दाबून न टाकता त्याला कसे सामाेरे जायचे याबाबत प्रत्येकाला माहिती ही हवीच. सकारात्मक किंवा नकारात्मक विचार यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे, हाे ना? मग आपण सकारात्मक विचारांचीच निवड केली पाहिजे ना? आता मला सांगा की विचार आधीच येऊन निघून गेले असतील, तर तुम्ही निवड कधी करीत बसणार! एक सकारात्मक विचार आला आणि निघून गेला. एक नकारात्मक विचार आला आणि गेला. काहीतरी निघून गेले आहे, तर ते गेल्यावर निवड करण्याला काहीच अर्थ नाही. परंतु काही वेळा आपण एखाद्या विचाराला धरून ठेवताे. आपल्याला विचार धरून ठेवण्याची निवड करता येते. आता ही निवड किंवा आपल्याला निवड करता येते हा विचार हे एक बंधन आहे. निवड हे गाेंधळलेल्या मनःस्थितीचे द्याेतक आहे. मनातील विचार स्पष्ट असतात तेव्हा तुम्ही निवड करीत नाही. हे म्हणजे, माझ्याकडे भिंतीमधून जाण्याचा किंवा दारातून जाण्याचा पर्याय आहे.असे म्हणणे झाले.
 
माझे विचार स्पष्ट असतील तेव्हा मी म्हणेन, नाही, मी दारातून जाईन.इथे काही पर्यायच नाही. म्हणून काही तरी जीवनासाठी उपयुक्त आहे असे तुमच्या लक्षात येईल तेव्हा ती गाेष्ट आपाेआप घडेल. ठीक आहे, मी आनंदी असणे आणि उदास असणे यामध्ये निवड करेन. मी प्रेमळ असणे आणि घृणास्पद असणे यात निवड करेन, असे आपण म्हणत नाही.म्हणताे का आपण असे? आपल्याला काही पर्याय आहे का? काेणाला घृणास्पद असणे आवडते का? हा एक आभास आहे. आपल्याला पर्याय आहे असा विचार करण्याने आपल्यावरील बंधन अधिक सशक्त हाेते.तुमच्या मनातील विचार स्पष्ट असतील तेव्हा जे काही जीवनरक्षक आहे, जे काही उत्क्रांतीकारक आहे त्याच्याच मार्गावर तुम्ही जाल. याबाबत अजिबात शंका नाही. तुम्ही गाेंधळलेले असता, तेव्हा ज्याची तुम्ही निवड कराल ती चुकीचीच असेल, कारण तुम्ही गाेंधळलेले असता.