मुरूड तालुक्यातील राजापुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात पर्यंटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले हाेते. आता पावसाळा संपल्याने सुमारे पाच महिन्यांनंतर पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले आहेत. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी प्रकाश घुगरे यांच्या हस्ते हे दरवाजे उघडण्यात आले. यामुळे पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा आता संपली आहे. किल्ला पाहण्यासाठी 15 वर्षांच्या आतील मुला-मुलींना शुल्क माफ असून, 16 वर्षांवरील पर्यटकांना प्रत्येकी 25 रुपये आकारण्यात येणार आहेत तसेच ऑनलाइन क्यूआर काेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती घुगरे यांनी दिली. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित आणि राजापुरी शिडाच्या बाेट चालक मालकांनी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने समाधान व्य्नत केले आहे. गेल्या रविवारी पुणे जिल्ह्यातील पर्यटकांनी किल्ले जंजिऱ्यास भेट दिल्याने आता येथील पर्यटन हंगामास सुरवात झाल्याचे मानले जाते.