भारतातील डिजिटल परिवर्तन ही संसदीय लाेकशाहीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रगतीने लाेकशाही व्यवस्था आणखी बळकट आणि गतिमान झाली आहे. जगातील सर्वांत माेठी लाेकशाही असलेल्या भारतात या तंत्रज्ञानामुळे शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकता, जबाबदारी आणि सहभाग वृद्धिंगत हाेत आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी येथे केले.
बार्बाडाेस येथे सुरू असलेल्या 68 व्या काॅमनवेल्थ पार्लमेंटरी असाेशिएशन (सीपीए) परिषदेत लिव्हर्जिंग टेक्नाॅलाॅजी एनहान्सिंग डेमाेक्रसी थ्रू डिजिटल ट्रान्सफाॅर्मेशन अँड टॅकलिंग द डिजिटल डिव्हाईड या विषयावरील कार्यशाळेत प्रा. शिंदे यांनी सहभागी हाेत भारतातील डिजिटल परिवर्तनाचा अनुभव आणि लाेकशाही व्यवस्था बळकटीकरणात डिजिटल तंत्रज्ञानाचे याेगदान याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
आरटीआय ऑनलाइन प्रणाली, माय जीओव्ही पाेर्टल, डीजीलाॅकर, उमंग अॅप व डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरसारख्या यशस्वी उपक्रमांचा उल्लेख प्रा. शिंदे यांनी केला. या याेजनांमुळे 80 काेटी नागरिकांना शासकीय लाभ थेट मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय निवडणूक आयाेगाने तांत्रिक सुधारणा करत मतदान यंत्रणा अधिक पारदर्शक बनवून जगात नवा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.