छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगडावर परंपरेप्रमाणे यंदाही अश्विन शुद्ध षष्ठीला मशाल महाेत्सव साजरा झाला. रात्री 366 मशालींनी हा गड उजळून निघाला. हा मशाल महाेत्सव पाहण्यासाठी व भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली हाेती.छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्विन शुद्ध पंचमीला प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना केली. त्या प्रीत्यर्थ प्रतापगडवासिनी श्री भवानी मातेच्या मंदिरास 366 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजाराे शिवभ्नत प्रतापगडावर मशाल महाेत्सव साजरा करतात. दरवर्षी नवरात्राेत्सवात शुद्ध पंचमीला हा उत्सव साजरा केला जाताे.यंदाही हा महाेत्सव उत्साहात साजरा झाला.
भवानी मातेची रात्री विधिवत पूजा व गाेंधळ झाल्यानंतर ढाेल-ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय...च्या जयघाेषात मशाली प्रज्ज्वलित करण्यात आल्या. नगारे, तुतारी, सनईच्या मंगलवाद्यांत एकेक मशाल पेटत गेली आणि त्यात गड उजळत गेला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. भवानी माता मंदिर ते माचीवरील ध्वज बुरुजापर्यंत तटावर या मशाली लावण्यात आल्या हाेत्या. किल्ल्याच्या चहूबाजूंनी विद्युत राेषणाईही करण्यात आली हाेती.प्रतापगडावर भवानी माता मंदिरात नवरात्रीत दाेन घट बसवले जातात. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून एक घट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बसवला जाताे, तर या हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केला म्हणून दुसरा घट राजाराम महाराजांच्या नावाने बसवला जाताे. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.