गीतेच्या गाभाऱ्यात

    12-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र तिसावे
 

bhagavtgita 
 
आता आपण एक झालाे- एक झालाे, या गाेष्टीचे तात्पर्य तू लक्षात ठेव.पांडवांवर कमालीचा अन्याय झाला हाेता. कृष्णाने तडजाेड हाेण्याकरिता शिष्टाई केली; पण सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील तेवढीदेखील युद्धाशिवाय पांडवांना मिळणार नाही, असे निर्वाणीचे उत्तर मिळाल्यावर न्याय प्रस्थापित करण्याकरिता युद्ध करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.पाश्चात्त्य विद्वान म्हणतात कीन्याय प्रस्थापित हाेण्याकरिता नाईलाजाने जी हिंसा केली जाते ती देखील अहिंसा या सदरात पडते.पाश्चात्त्य विद्वानांचे हे मत कृष्णाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे.महात्मा गांधीना प्रारंभी हे तत्त्व मान्य नव्हते. ते अहिंसेला जास्त मान देत हाेते. पण जीवनाच्या संध्याकाळी जगाला रामराम ठाेकण्यापूर्वी कृष्णाचे तत्त्वज्ञान त्यांना पटले व ता. 26/9/47 या दिवशी प्रार्थनाेत्तर प्रवचनात दिल्लीला ते म्हणाले-- If there is no other way of securing justice from Pakistan, India should wage war against Pakistan.
 
न्याय प्रस्थापित हाेण्याकरता जर दुसरा काेणताच मार्ग नसेल तर पाकिस्तानबराेबर हिंदुस्थानने युद्ध करणे याेग्य आहे, असे म. गांधींना वाटू लागले.त्यांची खात्री झाली की जीवनातील महान समस्या केवळ गीता ग्रंथच साेडवू शकताे.पांडवांचा पाठीराखा कृष्ण असल्यामुळे युद्धात त्याचा जय झाला.मग धर्मराजाने एका वर्षाने अश्वमेध यज्ञ पाठीराखा कृष्णाच्या सल्ल्याने केला. त्यावेळी कृष्ण चाैऱ्याएेंशी (84) वर्षांचा हाेता.मग कृष्ण द्वारकेत गेला तेथे ताे छत्तीस वर्षे राहिला.जीवनाच्या शेवटी शेवटी कृष्णाने उद्धवास उपदेश केला आहे.कृष्णाने आपला आतेभाऊ अर्जुन याला जाे उपदेश केला ताे म्हणजे गीतेचे तत्त्वज्ञान व कृष्णाने उद्धवास जाे उपदेश केला ताे म्हणजे भागवताचे तत्त्वज्ञान.जगाचा इतिहास सांगताे की दारूबंदी यशस्वी हाेत नाही.
 
उलट दारूबंदीमुळे नीतिमत्ता घसरगुंडीला लागते. पाच हजार वर्षांपूर्वी वासुदेवाने दारूबंदीचा हुकूम फर्माविला पण दारूबंदी यशस्वी न हाेता नीतिमत्ता घसरगुंडीला लागली व शेवटी यादवी हाेऊन यादवांनी परस्परांना ठार मारले.कृष्ण वसुदेवांकडे गेला व म्हणाला -- ‘‘तात, तिकडे बलराम एका वृक्षाखाली प्राणांचा निराेध करून बसला हाेता. मी तिकडेच जाताे व प्राणांचा अवराेध करून जगाचा निराेप घेताे. अर्जुनाला निराेप पाठवला आहे ताे इकडे येईल व तुमची व्यवस्था करील.असे म्हटले आहे की कृष्ण प्राणाचा निराेध करून जगातून निघून जाण्याकरिता झाडाखाली बसला असतांना एका व्याधाने कृष्णाच्या पायाच्या तळव्याला मृगाचे ताेंड समजून बाण मारला.तू असे लक्षात घे की, त्या व्याधाचे नाव ‘जरा’ असे सांगण्यात आले आहे. ‘जरा’ याचा अर्थ म्हातारपण असा आहे. हे रूपक असण्याचा संभव आहे. कृष्ण निजधामास गेला तेव्हा त्याचे वय एकशे वीस (120) वर्षे हाेते.